मुंबई - भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होत आहे, ते ईडी कार्यालयात पोहोचले असल्याची माहिती आहे.
राजकिय कारणास्तव जाणीवपूर्वक ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार का, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय. भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानं एकनाथ खडसें यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, ते कार्यालयात हजर झाले आहेत.
खडसेंच्या जावयांचीही चौकशी
भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूलमंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. त्यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.
यापूर्वी चौधरी यांना अटक
गिरीश चौधरी यांना ईडीनं मंगळवारी रात्री अटक केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यादेखील अडचणी वाढतील की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होतं. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असं नंतर समोर आलं होतं.