मुंबई - राज्यसभा निवडणुकानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या 2 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या दोन नावांमध्ये भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे हे विधिमंडळात येण्यासाठी उत्सुक होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही त्यांचं नाव होतं. मात्र, 12 आमदारांची नियुक्ती रखडल्याने त्यांना वेट अँड वॉच रहावे लागले. मात्र, राष्ट्रवादीने आता एकनाथ खडसेंना संधी दिल्याने ते विधिमंडळ सभागृहात दिसून येतील. त्यामुळे, आता सभागृहातही भाजप विरुद्ध खडसे अशी खडाजंगी पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसकडून भाई जगतपा व हंडोरे
काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोनिया गांधी यांनी या दोन नावांवर सहमती दर्शवल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस मुकील वासनिक यांनी दिली आहे.
भाजपची यादी जाहीर
भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही.