Join us

सुपारीबाजांमुळे मला राजीमाना द्यावा लागला; खडसेंचा अंजली दमानियांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 1:24 PM

दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले. माझ्यावर खोटे आरोप करणारे आज तोंडघशी पडले.

मुंबई: भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लीन चिट दिल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्यासह विरोधकांवर हल्ला चढवला. दोन वर्षापूर्वी माझ्यावर गैरव्यवहारचे आरोप झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली होती. केवळ काही सुपारीबहाद्दर समाजसेवक आणि समाजसेविकांनी तशी मागणी केली नव्हती, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले. माझ्यावर खोटे आरोप करणारे आज तोंडघशी पडले, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आला की माझ्यावर आरोप व्हायचे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. दोन वर्ष मला आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अस्वस्थ करणारी होती. मी कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे निर्दोष सुटणार असा विश्वास होता, असेही खडसे यांनी सांगितले. 

 

पुणे एसीबीने मंगळवारी खडसेंना क्लीन चिट दिली. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतेही नुकसान झालेले नाही, असं एसीबीने अहवालात म्हटले आहे. हा अहवाल एसीबीकडून पुणे कोर्टात सादर करण्यात आलाय. खडसेंविरोधातील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असंही या अहवालात एसीबीने नमूद केले आहे. 

पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन कुटुंबीयांच्या नावे करण्यावरून एकनाथ खडसे यांची आयोग नेमून चौकशी करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्यावर खडसे यांचा राजीनामाही घेण्यात आला. चौकशी आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्यानं अहवाल निरर्थक ठरल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खडसेंना क्लीन चिट दिलीय. त्यामुळे आता खडसेंना मंत्रिमंडळात घेतले जाणार का, याची चर्चा सुरू झाली.

टॅग्स :एकनाथ खडसेअंजली दमानिया