मुंबई - फोन टॅपिंगप्रकरणी महत्त्वपूर्ण साक्षीदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी कुलाबा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानुसार, गुरुवारी त्यांची दोन तास चौकशी करत कुलाबा पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले होते. यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या फिर्यादीवरून कुलाबा पोलिसांनी भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण देताच, न्यायालयाच्या आदेशाने १६ आणि २३ मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी त्यांची चौकशी करत, जबाब नोंदवून घेतला आहे.
याच प्रकरणात खडसे यांना समन्स बजावून गुरुवारी हजर राहण्याच्या सूचना कुलाबा पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, याच प्रकरणात अधिक तपासासाठी कुलाबा पोलिसांनी बुधवारी खडसे समन्स बजावून, गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. खडसे हे दुपारी १२च्या सुमारास कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाले.
मुख्य सूत्रधाराचा शोध महत्त्वाचा - खडसे रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या सूचनेवरून हे फोन टॅप केले? याबाबत सविस्तर तपास होणे गरजेचे आहे. तसेच, समाजविघातक कारवाया करणाऱ्यांच्या यादीत माझ्या नावाचा समावेश करत बदनामी केल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले. यापूर्वीसुद्धा फोन टॅप होत असल्याबाबत शंका उपस्थित केली होती. २०१९पूर्वी गृह सचिवांनाही पत्र लिहून याबाबत चौकशीची मागणी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.