मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं, असा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केला. यापूर्वी खडसेंनी फडणवीस आणि महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले होते. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत. पण, देवेंद्र फडणवीसांसोबत माझे संबंध बिघडलेत असं काहीही नाही. आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो, असेही खडसेंनी सांगितलंय.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करताना खडसेंनी कोअर कमिटीतील चर्चेचा संदर्भ दिला. 'कोअर कमिटीमध्ये तिकीट वाटपावर चर्चा झाली. त्यामध्ये 17-18 सदस्य होते. यातील अनेकजण माझ्या ओळखीचे होते. त्यांनी या बैठकीत झालेल्या घटनांची माहिती मला दिली. मला विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुढे काय झालं, याची तुम्हाला कल्पनाच आहे,' असं खडसेंनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत. त्यानंतर, फडणवीस आणि महाजन यांच्यावर मी नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
फडणवीस यांच्योसोबत माझं बोलणं सुरू असतं, एकेमेकांशी चर्चाही होत असते. माझे अन् त्यांचे संबंध बिघडलेत असं काहीही नाही. पण, मी माझ्या मनातील खंत बोलून दाखवली. कुणाचीही भाडभीड न ठेवता मी माझं मत मांडलंय, कारण मी स्पष्ट वक्ता आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटलंय. मला मिळालेली माहिती मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली आहे. म्हणून, मी देवेंद्रांवर किंवा गिरीश महाजनांवर नाराज आहे, असे म्हणणं योग्य नाही. माझं तिकीट का कापलं? याचं उत्तर मिळविण्याचा मला अधिकार आहे. इतर पक्षातून भाजपात आलेले नेते तुम्हाला चालतात मग, नाथाभाऊ का नाही? या प्रश्नाच उत्तर अद्याप मला मिळाल नाही, असेही खडसेंनी टीव्ही 9 शी बोलताना स्पष्ट केलंय.