Join us

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत म्हणाले, आयुष्याच्या या वळणावर...

By महेश गलांडे | Published: October 22, 2020 10:42 AM

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला.

ठळक मुद्देएकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे.

मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून 23 तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही खडसेंचं महाविकास आघाडीत स्वागत केलंय.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. गेल्या 40 वर्षे भाजपासाठी काम करणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे, खडसेंच्या या निर्णयामागे नक्कीच मोठं कारण असणार, उनकी कुंडली जम गई होगी... असे राऊत यांनी म्हटलंय.   

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, त्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे काय जबाबदारी देण्यात येणार याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन बाळगलं आहे. खुद्द एकनाथ खडसेंनीही कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. परंतु एकनाथ खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान केला जाईल असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वृत्त आल्यानंतर खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

फडणवीस म्हणाले

देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा पाहणी दौऱ्यावर असून पत्रकारांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल त्यांना विचारले होते. त्यावर बोलताना, खडसेंनी भाजपाचा राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती मला मिळाली नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आपली प्रतिक्रिया देतील, अशा शब्दात फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. तसेच, मला अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी यासंदर्भात बोलेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं. 

दिल्या घरी सुखी राहावं

राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय.

टॅग्स :एकनाथ खडसेभाजपासंजय राऊत