एकनाथ खडसे यांच्या पत्नीचीही ईडीकडून चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:02+5:302021-07-10T04:06:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी तब्बल ९ तास चौकशी केली. त्यानंतर आता या प्रकरणात खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहारप्रकरणी चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याचे समजते.
पुण्यातील भोसरी, एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडी तपास करत असून ईडीने मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंतर खडसे यांचे जावई गिरीश चौधरी याला अटक केली. तो सध्या ईडीच्या कोठडीत आहे. ईडीने बजावलेल्या समन्सनुसार एकनाथ खडसे हे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ तास त्यांची चौकशी केली. खडसेंच्या चौकशीपाठोपाठ मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र हजर राहण्यासाठी त्यांनी ईडीकडून वेळ मागितली असल्याचे समजते.