- गाैरीशंकर घाळेमुंबई : राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी पक्षनेतृत्वाने हिंदुत्वासोबत तडजोड केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या वैचारिक विरोधकांशी हातमिळवणी केल्याने वैचारिक पराभव झाला आहे. या दोन्ही पक्षांनी शिवसेनेचा पाया खिळखिळा करण्यासाठी सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानभवन सचिवाला एका सात पानी प्रस्तावाची प्रत पाठवून दिली. या पत्रावर शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, यामिनी जाधव, श्रीनिवास वनगा, संदिपान भुमरे, तानाजी सावंत यांच्यासह ३४ आमदारांच्या सह्या आहेत.मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागत आहे. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली. मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला तडा गेल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरही यात बोट ठेवण्यात आले आहे. मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष आहे. नवाब मलिक तुरुंगात असल्याने सरकारची प्रतिमा खराब होत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागत असल्याचा दावा या प्रस्तावात करण्यात आला आहे.
गटनेता आणि प्रतोद नियुक्ती३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असतील, असा ठराव संमत करण्यात आला. त्यासोबतच, पक्षाचे विधिमंडळ प्रतोद म्हणून आ. भरत गोगावले यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील प्रभू यांना तत्काळ प्रभावाने प्रतोद पदावरून हटविण्यात येत असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.