मुंबई - कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करता आला. त्यामुळे, गणेशोत्सवानंतर आता नवरात्री आणि दिवाळीही मोठ्या उत्साहात आणि आपल्या लोकांसमवेत प्रत्येकाला साजरी करता येणार आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या सरकारने यंदा गणेशोत्सवाला परवानगी दिली. त्यासोबतच मुख्यमंत्री शिंदेंचा उत्सवातील सहभाग लक्षणीय ठरला. त्यानंतर, आता नवरात्रीही जल्लोषात साजरी होणार असून दिवाळीतही अख्खी मुंबई उजळून निघणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीरच केलं. मुख्यमंत्री शिंदेंनी गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवामुळे नेते मंडळींना सर्वसामान्यांना भेटण्याची चांगली संधी मिळते. त्याचा पुरेपूर लाभ शिंदेंनी घेतला. या कालावधीत शिंदेंनी दररोज जवळपास ५० ते ६० मंडळांना भेटी दिल्या. येत्या काही महिन्यांत राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी गणेशोत्सवाचा वापर जनसंपर्क वाढवण्यासाठी केला. आता, नवरात्री उत्सवातही जोरदार तयारी असल्याचं ते म्हणाले. तर, दिवाळीही यंदा ठाण्यासोबतच मुंबईही विद्युत रोषणाईने उजळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलातना त्यांनी. आता नवरात्रीही मोठ्या उत्साहात होईल, असे म्हटले. मी अधिकाऱ्यांना विचारलं, गणेशोत्सवात किती पैसे मिळतात, ते म्हणाले अगदी थोडे. मग, मी म्हणालो सोडून द्या, गणेश मंडळांना मंडपासाठीचे पैसे यंदा माफ झाले. आता, नवरात्रीही जोरात होईल. मी अधिकाऱ्यांना सांगितलंय, दिवाळीला अख्ख्या मुंबईत विद्युत रोषणाई करा, आम्ही आमच्या ठाण्यात करतो, आता अख्ख्या मुंबईत होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरच केले.
मुंबई खड्डेमुक्त होणार
मुंबईत साडे ५ हजार कोटींचे रस्त्याचं काम तातडीनं सुरु झालंय. उरलेलं ४५० किलो मीटरचे रस्त्याच्या कामाचं टेंडर काढणार, मार्चपर्यंत तेही काम सुरू होईल. म्हणजे पुढील १.५ ते २ वर्षात अख्ख्या मुंबईतले रस्त्याचे काम होणार, खड्डेमुक्त रस्ते होणार.
कंपनी दोन महिन्यात निर्णय बदलते का?
वेदांता प्रकरणावरून सध्या वाद सुरू आहे. मात्र आम्हाला सत्तेवर येऊन दोनच महिने झाले आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्या कंपनीला ज्या पद्धतीने प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. तसा दिला गेला नाही. आता दोन महिन्यांमध्ये ते केलं गेलं पाहिजे होतं, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. एखादी इंडस्ट्री जी पावणेदोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे, ती अशी दोन महिन्यांत निर्णय बदलते का? त्यांचा निर्णय आधीच झालेला होता, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.