Join us  

Eknath Shinde: 8 दिवसांत शिंदेगटाच्या 3 आमदारांसोबत अपघात, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:17 PM

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली.

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतराची किमया करुन दाखवली. त्यानंतर, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारीत केल्यानंतर शिंदेगटाचे आमदार तब्बल 10 ते 15 दिवसांनी आपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. त्यामुळे, बहुतांश ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. दरम्यान, गेल्या 7 ते 8 दिवसांत शिंदे गटाच्या तीन आमदारांसोबतअपघाताची घटना घडली आहे. 

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली. तर, गेल्याच आठवड्यात आमदार संजय शिरसाट यांच्याही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. शिंदे गटाचे तिसरे आमदार शहाजी बापू पाटील हे आमदार निवासातील ज्या रुममध्ये राहात होते, त्या रुमचा छतच खाली कोसळला. सुदैवाने त्यावेळी, शहाजी बापू पाटील तेथे उपस्थित नव्हते. गेल्या 8 दिवसांत शिंदे गटातील या तीन आमदारांसोबत अपघाताची घटना घडली. सुदैवाने तिन्ही आमदार सुखरुप असून त्यांना जखम झाली नाही. 

भरत गोगावलेंच्या कारला अपघात

एकनाथ शिंदे गटातील मुख्य प्रतोद असलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी सकाळी अपघात झाला. मुंबईतील ईस्टर्न फ्री वे वर हा विचित्र अपघात झाला. एका मागोमाग एक अशा एकूण सात वाहनांचा हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतील आमदार निवासातून ते मंत्रालयाच्या दिशेने भरत गोगावले जात असताना हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली.

शहाजी बापूंच्या रुमवर छत कोसळला

आकाशवाणी आमदार निवासात शहाजीबापू पाटील यांची रूम आहे. या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचे काही समोर आलेल्या फोटोंमधून दिसून आले आहे. मुंबईतील या घटनेवेळी शहाजीबापू आमदार निवासात नव्हते. त्यामुळे, ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती मिळाली. 

संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात

आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीला 6 जुलै रोजी अपघात झाला. संजय शिरसाट विमानतळावरुन शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या मतदारसंघात जात होते. त्यावेळी त्यांच्याच ताफ्यातील केंद्रीय सुरक्षाचे जवान घेऊन जाणाऱ्या गाडीनेच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय शिरसाटांना दुखापत झाली नाही. ते सुखरुप आहेत. पण या अपघातानंतर आमदार शिरसाट यांचा पारा चांगलाच चढलेला दिसून आला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेसोलापूरशिवसेनाआमदारअपघातसंजय शिरसाट