शिंदे सरकारचा मोठा विस्तार, पहिल्या टप्प्यात २० जण मंत्री होणार?; शपथविधीच्या हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:58 PM2022-08-08T13:58:08+5:302022-08-08T13:59:13+5:30
राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-
राज्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी ११ वाजता राजभवनावर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यात २० पेक्षा अधिक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शपथविधीसाठीच्या हालचालींना देखील वेग आला आहे.
मोठी बातमी! २४ तासांत शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी?
स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे आणि यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे झेंडावंदन कार्यक्रमासाठी जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त करणं देखील महत्वाचं झालं आहे. तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पूर्णविराम देत उद्याच मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य आमदार हे त्यांच्या त्यांच्या मतदार संघात आहेत. त्यामुळे ते आज रात्रीपर्यंत मुंबईत येतील आणि उद्या सकाळी ११ वाजता राजभवनवर शपथविधीचा छोटेखानी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची चर्चा झाली. साधारणपणे दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
३० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा-शिंदे गटाचं सरकार अस्तित्वात आले. यात अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र एक महिना झाला तरी विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळ विस्तार कधी असा सवाल सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात येत होते.