Join us

Eknath Shinde : ... अन् एकनाथ शिंदेंनी 'धर्मवीर' आनंद दिघेंच्या वेशातील अभिनेत्याचे पाय धरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:27 AM

प्रसाद ओकचा लूक पाहून अनेकांना इतिहासातील आठवणींचा उजाळा मिळाला

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारलेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर साकारत आहे. व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशा विविध रुपातील आनंद दिघे यांचा जीवनपट "धर्मवीर" (Dharmveer)  या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे. चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. प्रसाद ओकच्या त्या लूकमध्ये मंत्री एकनाथ शिंदेनाही धर्मवीरांचाच भास झाला. 

प्रसाद ओकचा लूक पाहून अनेकांना इतिहासातील आठवणींचा उजाळा मिळाला. हुबेहुब आनंद दिघेंचा लूक पाहून अनेकांना धर्मवीर आठवले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना तर साक्षात आनंद दिघेच प्रसाद ओकमध्ये अवतरल्याचा भास झाला. म्हणूनच की काय, त्यांनी आनंद दिघेंच्या व्यक्तीरेखातील प्रसाद ओक यांचे पाय धरुन दर्शन घेतले.  

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या लूकमधील प्रसाद ओकला पाहून भारावले. गाण्याचे लाँचिंग झाल्यानंतर स्टेजवर फोटोसेशन सुरु होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओक यांनी एकमेकांसोबत फोटो काढले. मात्र, आनंद दिघे यांच्या रुपातील प्रसाद ओकला पाहून एकनाथ शिंदेंना भावना अनावर झाल्या. त्यामुळे, चक्क व्यासपीठावर सर्वांसमोर त्यानी प्रसाद ओकचे पाय धरले. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जिव्हाळा सांगणारा हा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे पाणावले. तर, या क्षणाची चर्चा सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

आनंद दिघेंमुळे एकनाथ शिंदे सर्वप्रथम नगरसेवक बनले होते. शिंदेच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा दिघेंपासून झाला, म्हणून ते आनंद दिघेंना आजही गुरूस्थानी मानतात. एकनाथ शिंदेंच्या राजकीय यशात आनंद दिघेंचं मोठं योगदान आहे, हे एकनाथ शिंदे कधीही विसरत नाहीत. कालच्या प्रसंगावरुन ते पुन्हा अधोरेखित झाले. 

प्रविण तरडेंचं दिग्दर्शन

अनेक नाटकं, चित्रपट आणि टीव्ही मालिकांतून आपलं अभिनेता म्हणून स्थान निर्माण केलेले मंगेश देसाई साहिल मोशन आर्टस् या निर्मिती संस्थेतर्फे "धर्मवीर" या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी अतिशय आव्हानात्मक विषयाची निवड केली आहे. "देऊळ बंद", "मुळशी पॅटर्न" यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटानंतर प्रवीण तरडे यांनी "धर्मवीर" चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेठाणेप्रसाद ओक सिनेमा