मुंबई/नाशिक - शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत असून, यावेळी ते अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान तसेच शहरातील विविध विकासकामांबाबत आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, यवतमाळ या शहरांना भेटी देत तेथील कार्यकर्त्यांना संबोधित केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात बंडखोरी करण्याची वेळ का आली हे सांगताना हे सरकार शिवसेनेचंच असून युती सरकारला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचंही ते सातत्याने सांगत आहेत.
एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या मालेगाव येथील सभेत एक किस्सा सांगितला होता. सध्या, त्या किस्स्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदेंनी फोन लावण्यासाठी थेट विमान थांबवल्याचं सांगितलं होतं. यावरुन, सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जात आहे. तसेच, फोन लावला तेव्हा त्यांच विमान हवेत होतं की जमिनीवर असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी सांगितलेला किस्सा चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबईतील लीलावती रुग्णालयात शिंदेंच्या परिचयातील व्यक्तीवर उपचार सुरू होते. मात्र, त्या व्यक्तीचा कुठलातरी रिपोर्ट मिळण्यास काहीही विलंब होत होता, यासंदर्भातील किस्सा शिंदेंनी सांगितला होता. 'मी विमानात बसलो होतो, लीलावतीमधील त्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, म्हणजे बिझी लागत होता. मग, मी पायलटला सांगितलं थांब, 5 मिनिटं थांब मला महत्त्वाचा फोन लावायचा आहे. त्यावेळी, पायलटने विमान थांबवलं 10 मिनिटं. माझी चर्चा झाली, आणि दादांना त्यांचा रिपोर्ट आला. वेळेवर फोन गेला नाही तर उपयोग काय त्याचा,' असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विमानातून डॉक्टरांना फोन केल्याचा किस्सा भरसभेत सांगितला.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी हा किस्सा सांगताना विमान नेमके जमिनीवर म्हणजेच धावपट्टीवर होते की, हवेत होते याबाबतचं वर्णन केलं नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर या किस्स्याला धरुन त्यांना ट्रोल केलं जात आहे.