Join us

Ramdas Kadam: "एकनाथ शिंदे अन रामदास कदमांसोबत येण्यास महाराष्ट्रातून प्रचंड ओघ"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 3:16 PM

मी मुंबईत फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे

मुंबई - शिवसेनेत ५२ वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. माझा मुलगा योगेश कदम राष्ट्रवादीसोबत गेला होता. त्याला आम्ही खेचून आणले. होय एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचविली. मी एकनाथ शिंदेंसोबत राज्यभर फिरणार, सभा घेणार, बैठका घेणार, पण उद्धव ठाकरेंवर टीका होऊ देणार नाही, असे म्हणत काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर, रामदास कदम आज मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, महाराष्ट्रातून प्रचंड फोन येत असल्याचंही ते म्हणाले.

मी मुंबईत फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, माझं कुठलंही काम नाही. मला गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून फोन येत आहेत. एकनाथ शिंदे अन रामदास कदमांकडे येण्यास महाराष्ट्रातून प्रचंड ओघ आहे. भाई आम्हाला तुमच्यासोबत यायचंय, आम्हालाही यायचंय, असे रामदास कदम यांनी मुंबईत आल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, आता काय हकालपट्टी करायची आहे ती करून घ्या, हकालपट्टी करण्यासाठी एखादी समिती नेमा, असा खोचक टोलाही कदम यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लगावला. तर, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल काहीही बोलायचं नाही, असेही त्यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीसोबत नको, असे मी म्हणालो

जेव्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करत होते, तेव्हा मी शेवटचा मातोश्रीवर गेलो. उद्धव ठाकरेंना हे पाप आहे, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करू नका, असे सांगितलेले. त्यानंतर पावणे तीन वर्षे झाली मी मातोश्रीवर गेलो नाही, असेही कदम म्हणाले. 

उद्धव ठाकरेच साधे आहेत

उद्धव ठाकरेंनी माझी हकालपट्टी केली. कोणाच्या सांगण्यावरून? त्यांच्या आजुबाजुला जी लोकं आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्यांना हाकलले पाहिजे. मी सांगतो मीच तुम्हाला मनातून काढून टाकले. उद्धव ठाकरेंकडे मी सहा महिने वेळ मागत होतो, मला दिला गेला नाही. भेटले नाहीत. बाळासाहेब साधे नव्हते, उद्धव ठाकरे तुम्ही साधे निघालात. तुम्हाला शरद पवारांनी फसविले, असा आरोप कदम यांनी केला 

टॅग्स :एकनाथ शिंदेरामदास कदमशिवसेनामुंबई