मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या संकल्प से सिद्धी या उपक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी, भाषण करताना मराठीत सुरुवात करत हिंदीत फटकेबाजी केली. तर, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा एक इंग्लिश कोटही सांगितला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या संकल्प से सिद्धी या कार्यक्रमात सहभागी होऊन राज्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचं त्यांनी स्वागत केलं. तसेच, गडकरी यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल, अशी ग्वाही यासमयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, नितीन गडकरी हे आमचे मार्गदर्शक असून त्यांचं यापुढेही आम्हाला मोलाचा मार्गदर्शन राहिल, असा विश्वास व्यक्त केला. सन 1995-99 मध्ये युती सरकारच्या काळात गडकरींच्या नेतृत्त्वात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचं काम पूर्ण झालं. त्यामुळे, प्रवासाला लागणारा वेळ कमी झाला. तसेच, मुंबईत 53 उड्डाण पूल बांधण्यात आले, आता ते 53 पूलही कमी वाटतात. यावरुन, नितीन गडकरी हे किती दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असेही शिंदेंनी म्हटले.