मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यात कोणकोणते नेते शपथ घेतील, याचीच उत्सुकता लागली आहे. त्यातच, ठाण्यातील भाजपचे नेते आणि शिंदेगटासोबतच्या युतीचे शिल्पकार राजेंद्र चव्हाण यांनाही भाजपकडून संधी देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पण, दिग्गजांना पुन्हा स्थान देत या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. तथापि, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे या दोन ज्येष्ठ सदस्यांना पहिल्या टप्प्यात स्थान दिले जाणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. रावल आणि कुटे हे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. विशेष म्हणजे मिशन गुवाहाटीमध्ये संजय कुटे यांचा थेट सहभाग होता. तर, मिशन गुवाहाटीत रविंद्र चव्हाण यांचाही प्रत्यक्ष सहभाग दिसून आला होता. त्यामुळे, रविंद्र चव्हाण यांना प्राधान्य देत त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचे समजते.
शिंदेंसोबत चव्हाणही होते नॉट रिचेबल
भाजप-शिवसेना युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघेही नेते बंडावेळी म्हणजेच सोमवारी (दि.२०) जूनच्या रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. युती नसताना शिंदेंवर टीकास्त्र सोडण्याचे चव्हाण यांनी एक तर टाळले किंवा विचारपूर्वक विधाने केली. थेट शिंदेंवर का बोलत नाही, असे चव्हाण यांना माध्यमांनी विचारले की, खासगीत शिंदे हे आमचेच असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचे ते हसत सांगत.
गुवाहाटीतही दिसले होते रविंद्र चव्हाण
महाराष्ट्रातून गेलेल्या आणि सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना मध्यरात्रीच गुवाहाटीला नेण्यात आलं होतं. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत असल्याचे दिसून आले होते. तर, संजय कुटे हेही हॉटेलमध्ये पाहायला मिळाले होते.
2 दिवसांपूर्वी शिंदेंनाच दिले होते आव्हान
कल्याण लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला भाजपसोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या लोकसभा निवडणूकीत भाजप कल्याण मतदार संघात नागरिकांच्या आवडीचा आणि विरोधी पक्षाच्या देखील मनातला उमेदवार दिला जाईल, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कळवा येथे झालेल्या एका बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते.