Bharat Gogawale Mumbai Accident: एकनाथ शिंदे गटातील मुख्य प्रतोद असलेले महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी सकाळी अपघात झाला. मुंबईतील ईस्टर्न फ्री वे वर हा विचित्र अपघात झाला. एका मागोमाग एक अशा एकूण सात वाहनांचा हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतील आमदार निवासातून ते मंत्रालयाच्या दिशेने भरत गोगावले जात असताना हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली.
भरत गोगावले हे महाडचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात ते पहिल्यापासूनच होते. त्यामुळे व्हिप बजावण्याचा अधिकार असलेले प्रतोद पद एकनाथ शिदे गटाने आमदार गोगावले यांच्याकडेच दिले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदार सक्रीय झाले आहेत. गोगावले हे काल महाडहून मुंबईला काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर आज ते आमदार निवासातून मंत्रालयाच्या दिशेने जात होते. तशातच फ्री वे वरून जात असताना एका टॅक्सीचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे एकामागे एक अशा एकूण सात वाहनांची एकमेकांना टक्कर झाली. पण सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सर्व वाहने वेगाने जात असल्याने वाहनांचे मात्र कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले.
"आमच्या रेषेत असलेल्या टॅक्सीमध्ये काही तरी बिघाड झाल्याने त्याने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे एका मागे एक सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात आमची गाडी सहाव्या क्रमांकावर होती. कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.", अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली. मंत्रालयाच्या दिशेने जात असताना हा विचित्र अपघात घडला.