शिवसेनेत जे घडलं त्यासाठी एकनाथ शिंदे यांना दोष देता येणार नाही. कारण त्यांच्यासोबत जे आमदार होते ते बाळासाहेबांच्या विचारांवर काम करणारे होते. राजकारणाची जी खिचडी आता झाली आहे त्यासाठी २०१९ साली शिवसेनेने काँग्रेसोबत केलेली हातमिळवणी हिच जबाबदार आहे, असं रोखठोक विधान मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या रोखठोक प्रश्नांना अमित ठाकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
"माझी लढाई विरोधी उमेदवारांसोबत नाही. मी माझं व्हिजन घेऊन लोकांसमोर जाईन, कारण शेवटी कौल जनतेचा असतो. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे याचा मी विचार करत नाही. कारण माझी लढाई त्यापेक्षा मोठी आहे", असं अमित ठाकरे म्हणाले. माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचं आव्हान असणार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहेत. त्यात तीनही उमेदवारांची मदार मराठी मतांवर असल्याने तिरंगी लढत इथे पाहायला मिळणार आहे.
शिंदेंना दोष देता येणार नाही, कारण...राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अमित ठाकरे यांनी २०१९ साली झालेली उलथापालथ राजकीय खिचडीला जबाबदार असल्याचं म्हटलं. "खरंतर २०१९ साली जे झालं ते सर्वात मोठं ब्लंडर झालं. तुम्ही मोदी आणि बाळासाहेबांचं नाव वापरुन निवडून आलात. त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या पक्षासोबत कसं जाऊ शकता? की जो पक्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात राहिलेला होता. तिथून जे ब्लंडर सुरू झालं ते आता सुरुच आहे. कोरोनाच्या काळात किती घोटाळे झाले. जेव्हा जग बंद होतं तेव्हा तुम्ही घोटाळे करत होतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पक्ष सोडला त्यापेक्षा २०१९ साली जेव्हा ते मविआ सरकार स्थापन झालं तिथूनच खरी उलथापालथ सुरू झाली", असं अमित ठाकरे म्हणाले.
...म्हणून राजकारणात आलो"मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो हे मी अनेकदा बोललोय. जाणीवपूर्वक बोलतोय कारण राजकारणातली सध्याची परिस्थिती पाहून मला राजकारणात यावसंच वाटलं नसतं. पण आपल्या देशाकडे तरुणांची ताकद आहे. जी जगात इतर कोणत्याच देशाकडे नाही. आपल्याकडे तरुणांची इतकी ताकद आहे की आपण जगाला हरवू शकतो. त्यामुळे आपल्याकडील तरुणांना कळलं पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि आपण काय करु शकतो. यासाठीच तरुणांचा आवाज म्हणून राजकारणात आलो", असं अमित ठाकरे म्हणाले.मुलाखतीचा व्हिडिओ लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर पाहा...