मुंबई - नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. अचानक भेटीचे वृत्त आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काल दिवसभरातील कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार केला, असे वृत्त आले होते. तसेच काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र नंतर अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी काही सोमवारी विधानसभेत विश्वासमत प्रस्ताव जिंकला होता. तसेच त्यानंतर धन्यवाद प्रस्तावावर केलेल्या भाषणातून सडेतोड भाषण करत आपल्यावरील आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे भाषण खूप गाजले. तसेच राजकीय वर्तुळातही या भाषणाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकल्यानंतर शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल, असा दावा केला होता. शरद पवार यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही तशीच विधाने केली आहेत.