मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडली असल्याने त्यांच्या आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तर, डॉक्टरांनीही मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने सातत्याने विरोधकांकडून टिका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस आज पुन्हा दिल्लीला निघाले आहेत.
सरकार स्थापनेच्या गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनात तयारी सुरू करण्यात आल्याचा माहिती आहे. राज्यात भाजपा-शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यात भाजपाचे ११६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार आहेत. मात्र, सरकार स्थापन आणि आमदारांचे निलंबन याची न्यायालयीन लढाई सुरु असल्याने हा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता न्यायालयाने सोमवारी सुनावणी करणार असल्याचं सांगितले. त्यामुळे, आता मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यातच, फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 4 वेळा दिल्लीवारी झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरुन दिवस-रात्र उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. एकीकडे प्रशासकीय बैठका आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांसाठी मेळाव्यात भाषणबाजी करताना ते दिसून येतात. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली आहे. शरीरावर ताण पडल्याने थकवा आला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, त्यांच्या आजच्या कार्यालयीने वेळेतील नियोजित सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तर, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे, लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो.