ठाण्यातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदेच हवेत मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:33 AM2019-07-30T03:33:33+5:302019-07-30T03:34:07+5:30

सोशल मीडियावर प्रचार; देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा

Eknath Shinde is the Chief Minister of Shiv Sena in Thane | ठाण्यातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदेच हवेत मुख्यमंत्री

ठाण्यातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदेच हवेत मुख्यमंत्री

Next

ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून या माध्यमातून शिवसेनेकडून त्यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणला जात आहे. त्यामुळे या स्पर्धेत आघाडीवर असलेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पिछाडीवर पडले होते. परंतु, आता महालक्ष्मी एक्स्प्रेसची घटना घडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर जनतेला असा मुख्यमंत्री पाहिजे, असा प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी पावसात पाण्यात उभे राहून मदतकार्य करतानाचे त्यांचे फोटोही पोस्ट केले आहेत. यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला ठाण्यातील शिवसेनेत उधाण आले आहे.

लोकसभेपाठोपाठ येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्यात आता शिवसेना आणि भाजपकडून मुख्यमंत्रीपदावरून चांगलेच खटके उडू लागले आहेत. त्यातही निवडणूक लागण्यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यांच्याकडे सुमारे तीसहून अधिक आमदारांचे पाठबळसुद्धा आहे. शिवाय, मातोश्रीला पाहिजे तेवढी रसद पोहोचविण्याचे कामही त्यांच्याच माध्यमातून सुरू आहे. कुठे आंदोलने असोत, तर कुठे सभा, प्रत्येक ठिकाणची जबाबदारीही त्यांनी एकहाती आपल्या खांद्यावर पेलल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिरासाठी गंगाघाट आणि अयोध्येला जाऊन उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला होता. यामध्ये शिंदे यांचाच अधिक पुढाकार दिसून आला. तर, दुसरीकडे पंढरपूरमध्ये झालेला कार्यक्रम, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचीही जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे आपसूक ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले होते. परंतु, शिवसेना आणि भाजपमध्ये युती असल्याने मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार, असा दावा भाजपने केला. दुसरीकडे शिंदे यांचे नाव यानिमित्ताने पुढे येणार असे बोलले जात असताना शिवसेनेच्या श्रेष्ठींनी त्यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचा चेहरा पुढे आणला आहे. त्यांच्यासाठी सोपा मतदारसंघ शोधण्याची मोहीमही सुरू आहे. असे असताना त्यांचा चेहरा महाराष्टÑभर चालावा, यासाठी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्याचीही जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर सोपविली आहे. परंतु, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतानाही ते आदित्य यांचा प्रचार करताना कुठेही कमी पडत नसल्याचे दिसून आले आहे.

शिंदेंच्या नावाला अनेकांचे समर्थन
वांगणी येथे शनिवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली आणि त्याठिकाणी एकनाथ शिंदे धावून गेले. ट्रेनमधील प्रवाशांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, खाद्यपदार्थही देऊ केले. याचा मात्र कोणीही उल्लेख न केल्याने त्यांच्या समर्थकांनी या कार्याची दखल घेऊन थेट सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. ते व्हायरल करताना जनतेला असा मुख्यमंत्री पाहिजे, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. अनेक समर्थकांनी ‘होय’ अशी प्रतिक्रिया नोंदविल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या हा मेसेज वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्याची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे. परंतु, या मेसेजमुळे थेट मातोश्रीलाच या मंडळींनी आव्हान दिल्याचेही बोलले जात आहे.



भाजपलाही आव्हान : या मेसेजच्या माध्यमातून शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आव्हान दिल्याची चर्चा आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सोमवारी मुरबाड-डोंबिवली दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेवून बाधीतांची भेट घेतलेली नाही. त्यामुळेच जनतेपर्यंत पोहोचणारा एकमेव नेता एकनाथ शिंदेच असून त्यामुळेच जनतेला असा मुख्यमंत्री पाहिजे, असाही मेसेज त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर टाकून भाजपासह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Web Title: Eknath Shinde is the Chief Minister of Shiv Sena in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.