मुंबई - शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसेंदिवस आपलं संख्याबळ वाढवताना दिसत आहेत. आपल्यासमवेत आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांशी मेळाव्याद्वारे संवाद साधत ते आपली भूमिका आणि बाळासाहेबांचं हिंदुत्त्व पटवून देत आहेत. अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदेगटात प्रवेश झाल्यानंतर आता खासदारांचा मोठा गटही एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्रीच दिल्लीला जात आहेत. त्यानंतर, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते शिवसेना खासदारांसह भेटणार असल्याचे समजते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे, त्यामुळे सर्वच खासदार दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत.
शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रीय कार्यकारिणी निवडण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेनेचे 12 खासदार या बैठकीला ऑनलाईन हजर होते, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यातच, शिवसेनेचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत, असे दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्रीच दिल्लीला जात असून ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेचे 12 खासदार शिंदेसमवेत असणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 18 जुलै रात्री 9 वाजता मुंबई येथून विमानाने नवी दिल्लीकडे प्रस्थान करणार आहेत. रात्री 11:25 वाजता ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पोहोचतील. त्यानंतर, दुसऱ्यादिवशी 19 जुलै रोजी ते शिवसेना खासदांरांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. या भेटीत राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचीही चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत शिंदेसमवेत असणार आहेत.