मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे थेट गुजरातच्या सूरत हॉटेलला पोहचले. त्याठिकाणाहून आता ते सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार आहेत. तर काही अपक्ष आमदारही शिंदे यांच्या गटात सहभागी आहेत.
मंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांची नाराजी एका दिवसातून उफाळून आली का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यात आता एकनाथ शिंदे सहा महिन्यापासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आले. इतकेच नाही उद्धव ठाकरे यांना ५-६ वेळा गृहमंत्रालयाकडून शिंदे यांच्या हालचालीची माहिती देण्यात आली. परंतु इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेवर ही परिस्थिती आल्याचं सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) समर्थक आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले ही माहिती गृह खात्याला कळली कशी नाही अशी नाराजी शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना २ महिन्यापूर्वीच सरकारला दिली होती. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही असा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. २ महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासह ८ ते १० आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली होती. ABP माझानं सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिलीय.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे, हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम गुप्तचर विभागाकडून केले जाते. दहशतवादी, माओवादी कारवायांसोबत राजकीय घडामोडींवरही गुप्तचर विभागाचे लक्ष असते. याच विभागाने राजकीय घडामोडींची माहिती सरकारला तोंडी दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा अंदाज येईपर्यंत खूप उशीर झाला आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. राजकीय नेत्यांच्या सूरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडून सर्व माहिती कळत असते. मग गुप्तचर विभागाने एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कुणकुण मुख्यमंत्र्यांना देऊनही त्यांनी मौन का बाळगलं हा प्रश्न आता विचारला जात आहे.