Join us  

Eknath Shinde Dasara Melava: 'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 7:07 PM

'राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले आणि अडीच वर्षे गायब झालात. कोरोना काळात महाराष्ट्रातील जनता होरपळत होती. पण तुम्ही...'

मुंबई: आज देशभरात दसऱ्याची धूम पाहायला मिळत आहे. पण, महाराष्ट्रात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् युद्ध पाहायला मिळणार आहे. दसरा मेळाव्यातून दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रय़त्न करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

'आम्ही तुमचा आजही आदर करतो, पण...'मेळाव्यात बोलताना शहाजीबापू म्हणाले, 'शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. सगळीकडे भाजसोबत मते मागितली, लोकांनीही आम्हाला भरभरुन मतदान केले. पण, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसले. ज्या शरद पवारांवर आणि सोनिया गांधींवर बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर टीका केली, त्या शरद पवारांसोबत आणि सोनिया गांधींसोबत तुम्ही आघाडी केली. बाळासाहेबांच्या कुंटुबातील असल्यामुळे आम्ही आजही तुमचा आदर करू. पण, एखाद्या मेलेल्या कुत्र्याला जस फरपटत नेऊन कचऱ्यात फेकतात, तसचं तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नेले. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही,' असे शहाजीबापू म्हणाले. 

'शिंदे साहेबांना आमच्या वेदना समजल्या'ते पुढे म्हणतात, 'आमच्या वेदना तुम्ही कधीही समजून घेतल्या नाही. आमच्या वेदना फक्त एकनाथ शिंदे यांनीच जाणल्या. शिंदे साहेबांनी धाडसाने एक पाउल उचलले. हे पाउल लोकांना आवडले नसते, तर लोकांनी आम्हाला जवळ केले नसते. आम्ही आतापर्यंत 45 मेळावे घेतले, अनेक नेत्यांच्या गावात मेळावे झाले. लाखांनी माणसे येत होती. मैदान पुरत नव्हते. सगळेजण एकनाथ शिंदेंच्या नावाने घोषणा देत होते. एकनाथ शिंदे साहेबांनाच आमच्या मनातील वेदना समजल्या.' 

'तुम्ही आम्हाला जनतेपासून दूर केले''तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अडीच वर्षे गायब झालात. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील जनता होरपळत होती. आम्हाला आमच्या लोकापर्यंत जायचे होते, पण तुम्ही राज्याला लॉक केले. आम्हाला आमच्या लोकांपर्यंतही जाता येत नव्हते. तुम्हीच आम्हाला जनतेपासून दूर केले. आमदार बाहेर पडले की, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आताही आमची पोरं रस्त्यावर येतात, केसेस अंगावर घेतात आणि यांची पोरं घरात बसून राहतात. बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी ज्या भगव्या झेंड्याला हातात घेतले. तोच भगवा झेंडा आता शिंदे साहेबांनी हातात घेतला आहे, तो झेंडा आता आपल्यालाही हातात घ्यायचा आहे आणि एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहायचे आहे,' असेही शहाजीबापू यावेळी म्हणाले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनादेवेंद्र फडणवीस