Eknath Shinde Dasara Melava: आज महाराष्ट्रात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् युद्ध पाहायला मिळणार आहे. दसरा मेळाव्यातून दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रय़त्न करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले
यावेळी बोलताना शरद पोक्षेंनी रामायण आणि महाभारतातले दाखले दिले. ते म्हणाले, 'रामायणात रावणाचा भाऊ बिभीषणाने भगवान श्री राम यांच्या बाजुने युद्ध लढले होते. श्रीरामाने बिभीषणाला आपल्या बाजूने लढायचे निमंत्रण दिले नव्हते. पण, बिभीषणाला माहित होते की, आपल्याला सत्याची, धर्माचीच साथ द्यावी लागणार आहे आणि रावण अधर्माच्या बाजूने आहे. म्हणूनच, तो रावणाविरोधात आणि श्रीरामांच्या बरोबरीने लढला. पण, त्याचा कधीच कोणी गद्दार म्हणून उल्लेख केला नाही.'
'महाभारतात कर्णाला हरवणे अशक्य होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र कर्नावर बाण मारण्यास सांगितले. पण, त्यालाही कोणी पाठीत खंजीर खुपसले असे म्हटले नाही. आज एकनाथ शिंदेंनी श्रीकृष्णाची भूमिका बजावली आहे. ज्या बाळासाहेबांनी म्हटले होते, माझा मुख्यमंत्री झाल्यावर मशिदीवरचे भोंगे खाली उतरवेन, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करेन, त्यांच्या मुलाने काय केले. सतत आमच्या देवांचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत बसले. एकनाथ शिंदेंचे पाउल किती योग्य होते, ते या मैदानावर आलेला जनसागर पाहून समजते,' अशी प्रतिक्रिया शरद पोंक्षे यांनी दिली.