Eknath Shinde Dasara Melava: आज महाराष्ट्रात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् युद्ध पाहायला मिळाले. दसरा मेळाव्यातून दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
'शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत '
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'आम्ही घेतलेली बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व रक्षणाची भूमिका, याला महाराष्ट्रातून पाठिंबा मिळतोय. खरी शिवसेना नेमकी कुठे आहे, या प्रश्नाचे उत्तर आज आलेल्या महासागराने दिले आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण आहेत, कुठे आहेत, या प्रश्नाचे उत्तर या गर्दीने सिद्ध केले आहे. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवले. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, तरीदेखील मैदानाच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही. सदा सरवणकर यांनी पहिला अर्ज दिला होता, पण राज्याच मुख्यमंत्री म्हणून कायदा सूव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. मैदान मिळाले नाही, पण शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत.
'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली'
सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला. त्याला तुम्ही राजकीय फायद्यासाठी, महत्वकांक्षासाठी राष्ट्रवादी-काँग्रेसकडे गहान टाकला. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात दिला. त्यांच्या तालावर नाचलात आणि आम्हालाही नाचवलात. बाळासाहेबांनी ज्या पक्षांना हरामखोर म्हणले, त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे पाहून बाळासाहेबांच्या विचारांसाठी, हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली. जाहीरपणे घेतली, लपूनछपून घेतली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मी राज्यभर फिरतोय. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. सर्वजण आमच्या पाठीशी आहेत. हा प्रेमाचा वर्षाव का होतोय? आम्ही चुकलो असतो, तर एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले नसते.
'आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे'
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना एकनाथ शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आणि तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे. समोर बसलेला प्रत्येक जण बाळासाहेबांचे निष्टावंत सैनिक आहोत. त्यांचे विचार तुमच्या-आमच्या धमन्यामध्ये आहेत. ते कधीच कोणालाही काढता येणार नाहीत. बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. वारसा विचारांचा असतो, तो जपायचा असतो. आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा जपलाय. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. एक मर्यादा असते सहन करण्याची. सत्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. खरे गद्दार कोण, हे जनतेला समजले आहे. त्यामुळेच जनता आमच्यासोबत आहे.