मुंबई - राज्यात गेल्या महिनाभरापासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान शिवसेनेतील फूट आणि नव्या सरकारच्या वैधतेबाबतचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या वकिलांनी सरन्यायाधीशांसमोर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर, आता कोर्टाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत देत पुढच्या सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार की, पुढच्या तारखेपर्यंत लांबणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासाठी कायदेशीर अडचण नसल्याचे लवकरच विस्तार होणार असल्याचे समजते. मात्र, विस्ताराला तारीख पे तारीख मिळत आहे.
राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल आणि तो दोन टप्प्यात असेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होणारा विस्तार हा लहान असेल आणि मोठा विस्तार हा अधिवेशनानंतर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आता, हा विस्तार या महिन्याच्या अखेरीस होईल, अशी माहिती आहे.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादामुळे हा विस्तार लांबनीवर पडल्याचं बोललं जात आहे. तर, विरोधकांकडूनही सातत्याने हे सरकार कोसळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, असेही बोलले जाते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे, उद्या किंवा परवा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा होती. मात्र, आता महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तार 26 किंवा 27 जुलैला होण्याची शक्यता आहे. कारण, 23 जुलै राज्यात भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, 24 जुलै रोजी राज्यभर आदिवासी पाड्यावर जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्याने भाजपाकडून हे सेलिब्रेशन होत आहे. त्यानंतर, 25 जुलै रोजी राष्ट्रपती शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहील. त्यामुळे, राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला असून 26 किंवा 27 जुलै रोजी हा विस्तार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार शिंदे सरकारचा आहे. तत्पूर्वी, महिनाअखेर मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो.