Join us

Eknath Shinde: राज्यातील 8.50 लाख रिक्षाचालकांसाठी मागणी, उदय सामंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 10:24 PM

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली

मुंबई - राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण होती. आपण बंड केला नसून उठाव केल्याचं सांगत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच आपला जीवनप्रवासही उलगडला. एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता, रिक्षाचालकांसाठी त्यांच्याकडे आमदार उदय सामंत यांनी मोठी मागणी केली आहे. 

एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर रिक्षावाला म्हणत टीका केली. "काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे, सध्या रिक्षाचालक राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच, शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.  महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मालकांसाठी सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांसाठी मंडळ स्थापन करावे ही मागणी पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली.. ह्याचा फायदा 8.50 लाख रिक्षा आणि 90 हजार टॅक्सी चालक व मालकांना होईल, असे सामंत यांनी पत्र म्हटले आहे.  

एकनाथ शिंदेंचा पलटवार

"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला" असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंवरील रिक्षावाला या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. काँग्रेसने मोदीजींना चायवाला म्हणून हिणवले, त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता पलटवार केला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही, तर सामान्य माणूसच राज्य करेल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनावर फडणवीसांनी निशाणा साधला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउदय सामंतशिवसेनामुख्यमंत्री