'बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार, ज्यांना टीका करायची, त्यांना करू द्या'- CM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:34 PM2023-07-07T14:34:25+5:302023-07-07T14:35:55+5:30
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.
मुंबई- आज शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे. नीलम गोऱ्हेंच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेते उपस्थित आहेत. शिवसेना-भाजप युती किती मजबूत आणि किती मनापासून तयार झाली आहे, ते आजच्या प्रवेशावरुन कळते.'
शिंदे पुढे म्हणतात की, 'आमची युती वैचारिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब, अटलजी, प्रमोद महाजन यांच्या विचारांना अभिप्रेत असलेले सरकार राज्यात स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्तावील सरकार त्याच विचारांवर काम करत आहे. त्याच धर्तीवर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन, व्हावे अशी जनतेची इच्छा होती. त्यानुसार आम्ही गेल्यावर्षी सरकार स्थापन कले. गेल्या वर्षभरात आम्ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले.ट
'ज्यांना टीका करायची, त्यांना करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. 2014 ते 2019 काळात युतीचे सरकार होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात आम्ही लोकहिताचे निर्णय घेतले. मधल्या काळात सरकार बदलले आणि आमच्या निर्णयांवर मर्यादा आणली, प्रकल्व मंदावले. आता आम्ही एका त्या लोकहिताच्या प्रकल्पांना गती देत आहोत. मेट्रो, कारशेड, समृद्धीसह इतर प्रकल्पांना आणि निर्णयांना आम्ही चालना देत आहोत.'
'शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे, न्यायालयानेही योग्य तो निर्णय दिला आहे. आता काहीजण त्याचा वेगळा अर्थ काढत आहेत, त्यांना काढू द्या. आज विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेक पदाधिकारी, माजी आमदार खासदार, जिल्हाप्रमुख आमच्यात येत आहेत. मनीषा कायंदे आल्या, आज उपसभापती पदावर काम करत असताना नीलमताई आल्या. बाळासाहेबांना अभप्रित असलेले निर्णय घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्यामुळेच अनेकजण सोबत जोडले जात आहेत,' असंही मुख्यमंत्री शिंदे यावेली म्हणाले.