मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिंदे गटासोबत शिवसेनेच्या तब्बल 39 आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतो, यासंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मात्र, हा खर्च भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. त्यातच, राष्ट्रवादीने या खर्चासंदर्भात ईडी चौकशीची मागणी केली आहे.
गुवाहटीतील हॉटेलात राहणाऱ्या शिवसेनेच्या 39 आणि अपक्ष 12 आमदारांचा, त्यांच्यासमवेत असलेल्या इतर सहकाऱ्यांचा खर्च नेमकं कोण आहे. कारण, या आमदारांवर सध्या कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी या खर्चाच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. 21 जूनपासून आसाममधील गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या आमदारांच्या खर्चाची ईडी (ED) चौकशी करा, असे अनिल गोटे यांनी म्हटले. राज्याचे गृह सचिव, मुख्य सचिव आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्याकडे ही मागणी केल्याचंही गोटेंनी सांगितलं. तसेच उद्या थेट मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन याची विचारणा करणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे, खरंच या आमदारांच्या खर्चाची ईडी चौकशी होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमदारांच्या खर्चावर बोलले दिपक केसरकर
आमदारांना चांगली पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे. पण, आम्ही अधिकृतपणे त्याचा खर्च भरतो, कन्सेशन घेतो. मात्र, पैसे भरुनच आम्ही इथं राहतो, मोफत राहत नाही. कुठलाही पक्ष आमचा खर्च करत नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी सांगितलं या फ्लाईटने या, आम्ही गेलो. जे काही पेमेंट असेल ते आम्ही करतो, असे दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच, तुम्हाला का वाटतं की भाजपच यामागे आहे, तसं नाही भाजप यामागे अजिबात नाही, असेही त्यांनी सांगितले.
7 दिवसांसाठी 56 लाख रुपये खर्च
गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमधील खोल्यांसाठी 7 दिवसांचे दर 56 लाख आहेत. यामध्ये एका दिवसाचं जेवण आणि इतर सेवांचा खर्च सुमारे 8 लाख रुपये आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. या हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक केलेल्या 70 खोल्यांव्यतिरिक्त, व्यवस्थापन नवीन बुकिंग स्वीकारत नाही. आता फक्त तेच लोक हॉटेलमध्ये येऊ शकतात ज्यांचे बुकिंग आधीच झाले होते. याशिवाय हॉटेलमध्ये मेजवानीही बंद आहे.