Join us

Eknath Shinde: खातेवाटपाची एवढी घाई का?, सरकार असंवेदनील म्हणत अमोल मिटकरींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:04 AM

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 5 वाजण्याच्या सुमारास खातेवाटप केले.

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाईल याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांकडून आता खातेवाटपावरही टिका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खातेवाटपाची एवढी घाई का, असे म्हणत शिंदे सरकारवर टिका केली आहे. दिवंगत नेते विनायक मेटेंच्या निधनाचा दाखला देत मिटकरींनी सरकारला लक्ष्य केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 5 वाजण्याच्या सुमारास खातेवाटप केले. तत्पूर्वी माजी आमदार आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते विनायकराव मेटे यांचे निधन झाल्याने रुग्णालयात जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. आता, या अपघाताच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मात्र, त्याचदिवशी खातेवाटप केल्याने मिटकरी यांनी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी खातेवाटप होत नसल्याने सरकारवर टिकास्त्र सोडणाऱ्या मिटकरींनी आता खातेवाटप घाईने का केले, असे म्हणत टिका केली आहे. 

खातेवाटपानंतर राष्ट्रवादीने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. "शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली" असं म्हणत टीका केली आहे. तत्पूर्वी, सरकारची संवेदना हरवली आहे का? श्री विनायकराव मेटे साहेबांचे निधन होऊन काही तासही उलटले नाहीत आणि अंत्यसंस्कार पण झाले नाहीत आणि घाईघाईत खातेवाटप जाहीर केले, असे म्हणत खातेवाटपावरुनच त्यांनी निशाणा साधला. तसेच, निदान उद्यापर्यंत थांबला असता तर काही बिघडलं नसतं. अशावेळी राजकारण करणे हे संवेदनाशुन्यतेचे लक्षण आहे, असा टोलाही मिटकरी यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे असलेली खाती

दरम्यान, खातेवाटपानुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. 

शिंदे गटाला तोंडाला पाने पुसली

"शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली" असं म्हणत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला?" असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :अमोल मिटकरीएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस