Maharashtra Political Crisis:: एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, पहिल्यांदाच मीडियासमोर बोलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 01:55 PM2022-06-28T13:55:17+5:302022-06-28T15:26:54+5:30
आमच्यासोबत 50 आमदार आहेत, ते सर्वजण आनंदात आहेत. आमचे प्रवक्ते तुमच्याशी संवाद साधत आहेत, वेळोवेळी ते भूमिका मांडत आहेत.
मुंबई - शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाला भाजप नेत्यांची फूस असल्याचा आरोप शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहेत. शिंदे गटाकडून अद्यापही याबाबत स्षष्टपणे सांगण्यात आले नाही. तर, भाजपनेही स्पष्टता केली नाही. मात्र, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी फडणवीसांच्या भूमिकेबाबत स्पष्टता केली आहे. फडणवीसांची मदत घेतल्यास चुकीचं काय, असं केसरकर यांनी म्हटलं होतं. आता, प्रथमच एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, 50 आमदार आमच्यासोबत असून ते आनंदात असल्याचं ते म्हणाले. तसेच, लवकरच मुंबईला येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गुवाहाटीतील आमदारांच्या महाराष्ट्रावापसीबद्दलचा प्रश्न संजय राऊतांना विचारा. त्यांनीच लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. त्यामुळेच, आम्ही महाराष्ट्रात येत नाही. तसेच, तुमच्याकडे संख्याबळ नसतानाही कशाला सांगता, 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 51 आमदार तुमच्यापासून दूर गेलेत हे कबुल करा, अशा शब्दात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना सुनावले होते. आता, स्वत: एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख आणि संजय राऊतांना थेट आव्हान दिलं आहे.
आमच्यासोबत 50 आमदार आहेत, ते सर्वजण आनंदात आहेत. आमचे प्रवक्ते तुमच्याशी संवाद साधत आहेत, वेळोवेळी ते भूमिका मांडत आहेत. मात्र, समोरच्यांकडून जो दावा केला जातो तो खोटा असून 21 आमदार संपर्कात असल्याचं सांगून दे दिशाभूल करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच, शिवसेना नेते आणि प्रवक्त्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं आहे. जर तुमच्यासोबत 21 आमदार आहेत, तर त्यांची नावे जाहीर करा, असे चॅलेंजच शिंदेनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना दिलं आहे. दरम्यान, गुवाहटीतील बंडखोर आमदारांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात असल्यचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांनी सातत्याने म्हटलं आहे. त्यावरुनच, शिंदेंनी हे चॅलेंज दिलं आहे. तसेच, आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्त्व पुढे नेत असल्याचंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांशी आमचे चांगले संबंध
देवेद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसरकर यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर बोलताना आपली भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध मित्रत्त्वाचे आहेत. मी रात्री 12 वाजताही देवेंद्र फडणवीसांना फोन केला तरी ते माझा फोन घेतात. केवळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाहीत. तर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत, असे म्हणत आम्ही फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय, असा थेट सवाल केसरकर यांनी विचारला आहे.
तेव्हा मुंबईतही हॉटेलमध्येच राहिलो
गुवाहाटीतील आमच्या हॉटेलचा खर्च कोण करतं, या प्रश्नावरुनही त्यांनी भूमिका मांडली. तसेच आम्ही आमदार आहोत, आम्हाला चांगल्या पगारी आहेत. मग आमचा राहण्याचा खर्च आम्ही करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठीही आम्ही मुंबईतील फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहत होतो. त्यावेळी, आमच्या राहण्याचा, या हॉटेलिंगचा खर्च कोणी केला, याबाबत कुणीही प्रश्न विचारला नाही, असेही ते म्हणाले. त्यावेळी, पक्षप्रमुखांना आम्हाला तेथे राहायला सांगितलं होतं, येथे आमच्या गटनेत्यांच्या आदेशावरुन आम्ही येथे राहात आहोत, असेही केसरकर यांनी सांगितले.