Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निवडणुकांचे समीकरण बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:08 AM2022-06-23T09:08:04+5:302022-06-23T09:08:41+5:30
Eknath Shinde: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कायम राहिले व ते भाजपसोबत गेले तर शिवसेनेला मुंबई, ठाणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कायम राहिले व ते भाजपसोबत गेले तर शिवसेनेला मुंबई, ठाणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या बांधणीपासून सर्वच प्रकारची जमवाजमव करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल.
औरंगाबाद आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या महापालिकांमध्येही शिवसेनेचे चांगले अस्तित्व आहे. प्रशासक येण्यापूर्वी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शिवसेनेची सत्ता होती. जळगावची महापालिका शिवसेनेच्या हातात आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही शिवसेनेची पकड आहे. मात्र, आता या पट्ट्यातील आमदार मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक शिवसेना आमदारही शिंदे कॅम्पमध्ये गेले आहेत. विदर्भात शिवसेनेची ताकद नाही. बुलडाणा जिल्ह्यातील पक्षाचे दोन्ही आमदार शिंदेंसोबत आहेत. अकोला जिल्ह्यातील एकमेव आमदार नितीन देशमुख हे शिंदे गोटातून परतले.
भाजप आणि शिंदे असे एकत्रित सरकार झाले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. त्याच वेळी सरकार नसल्याने राष्ट्रवादी आणि विशेषत: काँग्रेसचे नुकसान संभवते.