मुंबई - पुण्यातील एमआयडीसीत उभारणारा वेदांता ग्रुपचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. पुण्यातील तळेगावजवळ हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भातील पूर्वतयारी केली असून याची घोषणाही झाली होती. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. त्यावरुन, विरोधकांनी राज्य सरकारला आणि शिंदे-फडणवीसांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी सरकावर जोरदार प्रहार केला. तर, नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदेंच्या औरंगाबादेतील भाषणाचा संदर्भ देत जोरदार निशाणा साधला आहे. आता, आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदुत्वाचा संदर्भ देत शिंदे सरकारवर टिका केल आहे.
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. त्यानंतर, आता नाना पटोले यांनीही तोफ डागली. आता, अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील लाखो हिंदू युवकांचा रोजगार गेल्याची टिका शिंदे सरकारवर केली आहे.
वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती. तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची ! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदु तरुण बेरोजगार केले. त्यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खुश केले आहे, असे म्हणत मिटकरी यांनी शिंदे सरकावर निशाणआ साधला. तसेच, वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरात कडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे, असेही ते म्हणाले.
लंपी आजारावरुन सरकारला हिंदुत्त्व दाखवले
लंपी या आजाराने जुलै महिना अखेरपर्यंत तब्बल 67 हजार जनावरांचा जीव घेतला एकट्या राजस्थान या राज्यात दिवसाला 600 ते 700 गोवंश दगावत आहे . हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करू पाहणाऱ्या या सरकारकडे हिंदुत्वाचे गोवंश आणि पशुधन वाचवायला पुरेसे मनुष्यबळ आणि लसीकरण नाही. ज्या गोवंशाला लम्पी ची लागण झाली त्याला पूर्णपणे बरे करण्यासाठी किमान 15 ते 20 हजार रुपये खर्च लागतो. परंतु संकटात असलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सरकारकडे पुरेसं मनुष्यबळ नाही पुरेसे पशुवैद्यकीय स्टाफ नाही. दगावलेल्या जनावरांच्या शवविच्छेदनासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही.