Join us

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 9:41 AM

ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे.

मुंबई-

ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव तसंच नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारनं अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्यानं निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर सरकारला कॅबिनेट बैठक घेता येत नाही. असं असतानाही ठाकरे सरकारनं बैठक घेतली आणि लोकप्रिय निर्णय घेतले. यावर आक्षेप घेत ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच याबाबतचं सूतोवाच केले होते. दरम्यान, हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

ठाकरे सरकार कोसळण्याआधी २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेऔरंगाबादउस्मानाबाद