शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय ठरतंय?, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:06 AM2022-06-27T11:06:06+5:302022-06-27T11:06:23+5:30
शिंदे गटाला १६ मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे येऊ शकतील.
मुंबई- राज्यात भाजप - एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झाल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या मंत्री असलेल्या व शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील, असं सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्च कडू आणि राजेश पाटील यड्रावकर यांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे दिली जातील. एक किंवा दोघांना कॅबिनेट मंत्रिपदही दिले जाऊ शकते. भाजप आणि शिंदे गटात मंत्रिमंडळ रचनेबाबत तीन फेऱ्यांची चर्चा आतापर्यंत झाली आहे. सरकार स्थापन करण्यातील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करून मंत्रिमंडळाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाऊ शकते.
एकनाथ शिंदे आज परिपत्रक काढणार; पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, राज्याचं लक्ष
एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बंडासाठी ज्या हालचाली गेले दोन-अडीच महिने सुरू होत्या, त्या हालचालींमध्ये शिवसेनेच्या ज्या दोन आमदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची कमाल सदस्यसंख्या ४२ इतकी असते. शिंदे गटाला १६ मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे येऊ शकतील. दोन्ही बाजूंचे काही समर्थक अपक्ष आमदार आहेत त्यांचे समाधान आपापल्या पातळीवर करावे, असा निर्णय होऊ शकतो.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेलं बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.