मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाने पुन्हा एकदा आपली खंत बोलून दाखवली.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेले निर्देश योग्य आहेत, असे सांगत राज्यपालांनी बहुमत चाचणीच्या दिलेल्या निर्देशांविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे तो विषय आता राहिलेला नाही. सदर केसमधील बरेसचे विषय होते, ते आपोआप सुटलेले आहेत, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
शरद पवार हवेत की शिवसैनिक
कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. अनेक महिने विधिमंडळाला अध्यक्षच नव्हता. ही गोष्ट योग्य नाही. आता नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे कामकाज पुढे योग्य पद्धतीने सुरू राहील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.