स्वत:चं कुटुंब सांभाळता येत नाही, तो...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:21 AM2022-10-06T09:21:11+5:302022-10-06T09:21:43+5:30
मी शिवाजी पार्कच्या अनेक सभा पाहिल्या. ५२ वर्षाचा अनुभव मला आहे. परंतु आजचा जनसागर पाहून आपण सगळे एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठाम असल्याचं दाखवून दिले असं त्यांनी म्हटलं
मुंबई - आपले बंधू बिंदुमाधव स्वर्गवासी झाले. त्यांचे चिरंजीव न्यायालयात एकनाथ शिंदेंच्या बाजूने न्यायालयात लढाई लढतायेत. स्मिता वहिनी इथं बसल्यात. जयदेव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या. तुमचे चुलत बंधू राज ठाकरे हे तुमच्यासोबत नाहीत. तुम्ही स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकले नाही मग महाराष्ट्राला कसं सांभाळाल? असा सवाल रामदास कदमांनीउद्धव ठाकरेंना केला. कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही. कुटुंब एकनाथ शिंदेंसोबत आहे. आम्ही अनेक पावसाळे पाहिले. कुठलाही कार्यकर्ता मोठा होता कामा नये. कार्यकर्ता मोठा झाल्यावर त्याला संपवणं ही निती उद्धव ठाकरेंची आहे असा आरोप रामदास कदमांनी केला.
रामदास कदम म्हणाले की, आनंद दिघे यांच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा मागितला होता की नाही? दिघेसाहेब मोठे होताना पाहिल्यावर त्यांना राजीनामा मागितला. गुलाबराव पाटलांचे भाषण चांगले होत असल्याचं पाहताच बोलू नका असं त्यांना सांगितले. एकनाथ शिंदेंना झेड सिक्युरिटी देऊ नका असा निरोप गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंना उद्धव ठाकरेंकडून आला. बाळासाहेबांनंतर माझी भाषणं बंद करण्यात आली. भाई तुम्ही मीडियासमोर जायचं नाही असं सांगितले. पक्षातील नेत्यांना संपवून टाकायचं, उद्ध्वस्त करायचं हे उद्धव ठाकरे करतात. मी शिवाजी पार्कच्या अनेक सभा पाहिल्या. ५२ वर्षाचा अनुभव मला आहे. परंतु आजचा जनसागर पाहून आपण सगळे एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठाम असल्याचं दाखवून दिले असं त्यांनी म्हटलं.
तसेच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी पडलेल्या आमदारांना निधी देत होते. पुढचा आमदार राष्ट्रवादीचा असेल असं त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणत होते ही अवस्था सगळ्या आमदारांची होती. अजित पवार मंत्रालयात दिवसरात्र बसून त्यांच्या नेत्यांना निधी देत होते. उद्धव ठाकरे केवळ ३ दिवस मंत्रालयात गेले. आमदारांना, खासदारांना भेट देत नव्हते. निवडून येणे इतके सोपे नसते. तुमचं छोटं पिल्लू आदित्य ठाकरेंना आमदार करण्यासाठी वरळीत २ आमदार द्यावे लागले. प्रत्येक आमदार स्वत:च्या ताकदीवर निवडून येतो असा टोला कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत दसरा मेळावा
काल आलेली अंधारे बाई तिला उपनेता बनवलं. मी ओळखत नाही. निष्ठा तिच्याकडे आहे. लांडगा भास्कर जाधव त्याला शिवसेनेचा नेता बनवला. त्याच्याकडून आम्ही शिवसेना समजायची. लांडगे, गद्दारांना आमच्या अंगावर सोडलं तर त्यांना सोडणार नाही. अनेक गोष्टी आम्ही बोलू शकतो. खोक्याची भाषा तुमच्या आणि आदित्य ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. एकनात शिंदे यांच्या पाठिशी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे घरातून बाहेर कधी पडले? कोकणी माणसानं शिवसेना मोठी केली मात्र अडचणीत उद्धव ठाकरेंनी साथ दिली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला असं रामदास कदमांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"