Join us

ज्यांना कावीळ झालीय त्यांना...; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 2:58 PM

उद्धव ठाकरेंना किती अभ्यास आहे माहिती नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाही. पंचनामा होत नाही तोवर मदत जाहीर करता येत नाही त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना नसावी असं कदम म्हणाले.

मुंबई - ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालीय. अडीच वर्ष कधी ते घराबाहेर पडले नाही. केवळ २-३ दिवस मंत्रालयात आले. अडीच वर्षात कुठलाही निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली नाही. कोकणात वादळ आले. मात्र कोकणवासियाचे अश्रू पुसण्यासाठी उद्धव ठाकरे गेले नाहीत. आदित्य ठाकरेही गेला नाही. आज ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचा आनंद झाला असा खोचक टीका बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. 

रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना किती अभ्यास आहे माहिती नाही. अद्यापही पाऊस सुरू आहे. पंचनामे झाले नाही. पंचनामा होत नाही तोवर मदत जाहीर करता येत नाही त्याची कल्पना उद्धव ठाकरेंना नसावी. फक्त दिखावा करण्यासाठी दौरा केला. अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते व्हावे असं मला वाटतं हे कदमांनी सांगितले. तसेच अडीच वर्षात तुम्ही काय काम केले हे लोकांना सांगावे. अडीच वर्षात शिंदे-फडणवीस सरकारने ४०० निर्णय घेतले. जे चांगले आहे त्याचे कौतुक करण्याचं धाडस हवं. मुख्यमंत्रिपद गेल्याने त्याचे दुख आम्हाला समजू शकते. आनंदाचा शिधा काही ठिकाणी पोहचला नाही. पण अनेकठिकाणी १०० रुपये शिधा पोहचला. त्याला तुम्ही नाकारू कसं शकता? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. 

गद्दारीचा पराक्रम शिंदे गटाने केलाविराट कोहली मैदानात खेळले आणि मैदानात जिंकले. गद्दारांनी त्यांची तुलना विराट कोहलींशी करू नये हे हास्यास्पद आहे. भारतीय टीम मैदान सोडून पळाले नाहीत. खेळाडूंनी देशाचा अभिमान वाढवला. तुम्ही मैदान सोडून पळाला. गद्दारी केली अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

तर देशात लॉकडाऊन कुणी जाहीर केला? तेव्हा हिंदुचे सण कुठे गेले होते. गर्दी करणं रोग प्रसाराला बळी पडण्यासारखे होते. केवळ मंदिर बंद नव्हते. मस्जिद, चर्चही बंद होते. अडीच वर्ष कशात गेली हे जगाला माहिती आहे. भाजपाला लाज वाटली पाहिजे. उभ्या मुंबईचे बेस्ट बसवर एकच जाहिरात कशी आली? हे जरा सांगा. अनेक प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या करतायेत यावर राजकारण करताय लाज वाटली पाहिजे. सातत्याने खोटे बोलणं हे सरकारचे काम आहे असं असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. 

टॅग्स :रामदास कदमउद्धव ठाकरेअरविंद सावंतभाजपा