Dasara Melava: एकनाथ शिंदेंची ही कसली खेळी, ठाकरेंनाही बीकेसीवरील दसरा मेळाव्याचं आमंत्रण! चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:53 PM2022-10-05T13:53:03+5:302022-10-05T13:53:18+5:30
Dasara Melava: शिवतीर्थ आणि बीकेसीच्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे डोळे लागले असतानाच शिंदे गटाने चतुर खेळी केल्याचे सांगितले जात आहे.
Dasara Melava: दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. संपूर्ण देशाचे आणि राजकीय वर्तुळाचे या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे लागले आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ठाकरे कुटुंबाला आमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे.
दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असताना शिंदेगटाकडून या सभेचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन देत एकनाथ शिंदे यांनी हा टीझर ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच एकनाथ शिंदे गट ठाकरे कुटुंबातील सदस्य मेळाव्यात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरेंनाही बीकेसीवरील दसरा मेळाव्याचे आमंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टीव्ही९ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. शिवसेनेचे ५० आमदार आणि १२ खासदार आमच्यासोबत आहेत. आता दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. जे आमदार, खासदार प्रवेश कऱणार आहेत त्यांची नावे सर्वांना कळतीलच. मुंबई, मराठवाडा कुठलेही ते असू शकतात. प्रभावी खासदार आमच्याकडे आलेले दिसतील, असा मोठा दावा शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"