Maharashtra Politics: शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार? ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मेगा प्लान; समर्थक सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:08 AM2022-09-14T00:08:05+5:302022-09-14T00:08:48+5:30
शिंदे गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत दसरा मेळावा, आगामी काळातील निवडणुकांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आगामी महानगपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह दसरा मेळाव्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका आणि दौरे यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा यांच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला उत्तर आणि उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाकडून मोठी रणनीति आखली जात असल्याचे सांगितले जात आहे. याचच एक भाग म्हणून हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
२० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर राज्यभर शिंदे गटाची यात्रा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी हिंदू गर्व गर्जना यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. ही यात्रा २० सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे समजते. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा १६ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या या यात्रेत त्यांच्या समर्थक आमदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. शिंदे समर्थक आमदारांवर जिल्ह्यातील एका मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करुन एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत जनतेच्या अपेक्षा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत नेते, उपनेते, महिला आघाडी, युवासेनेचे पदाधिकारी यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. आगामी काळात रणनीति कशी असावी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी कशी करावी, यांसारख्या अनेक विषयांवर एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती उदय सामंत यांनी मीडियाशी बोलताना दिली.