मुंबई-
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही? ठाकरेंकडून मैदानांसाठी शोधाशोध! MMRDAला पत्र
शिवसेनेच्या कामगार सेनेकडून बीकेसीतील कॅनरा बँकेजवळच्या मैदानासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण एका कंपनीकडून याआधीच कार्यक्रमासाठी ग्राऊंड आरक्षित केलेलं असल्यानं ठाकरेंना परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसीमध्ये दोन मैदानं आहेत. यातील एमएमआरडीच्या मुख्य मैदानासाठी शिंदे गटाकून अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या नियमाअंतर्गत एमएमआरडीएकडून शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेकडून बीकेसीतील दुसऱ्या मैदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण संबंधित मैदान आधीच एका कंपनीकडून कार्यक्रमासाठी आरक्षित केल्यानं ठाकरे गटाची परवानगी नाकारण्यात आली आहे.
...तर मग शीवतीर्थवर आम्हालाच परवानगी बीकेसीतील मैदानासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य हाच निकष जर लावण्यात आला असेल तर शीवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यसाठी आम्हालाच परवानगी मिळायला हवी. कारण शिवसेनेनं पहिला अर्ज दाखल केला आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. "आमचा गट वगैरे काही नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि एमएमआरडीएवर शिंदे गटाला परवानगी देण्यात आल्याचं मला कळालं. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषाअंतर्गत त्यांना परवानगी देण्यात आली असेल तर शीवतीर्थवर शिवसेनेलाच परवानगी मिळायला हवी. कारण आम्ही आधी अर्ज दाखल केला आहे. दसरा मेळावा ही एक परंपरा आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीवगैरे करण्याची आम्हाला गरज नाही. परंपरेनुसार शीवतीर्थवरच शिवसेनेचा मेळावा होईल", असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.