मुंबई - शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षात २ गट पडले. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील ४० आमदार, १२ खासदार गेले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेत दोन्ही गटाला नवं नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यात एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आले आहे. याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतील मुंबईतील १ आमदार नाराज असल्याचं समोर आले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दिलीप लांडे नाराज झाल्याचं पुढे आले. या बैठकीनंतर आमदार लांडे म्हणाले की, मुंबई उपनगर जिल्हा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून खोटं सांगितले जाते. मंत्र्यांना खोटं सांगितले जाते. प्रशासनातील अधिकारी काम करत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय जागेत नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु २ वर्ष झाली तरी साधा फलक लावू शकले नाहीत. सूचना सांगून पण काम होत नसतील. तर या बैठकीत येऊन आमदारांनी फक्त नाश्ता करायचा, त्याचे तोंड बंद करायचे तर हे काम माझ्याकडून होणार नाही अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.
कोण आहेत दिलीप लांडे? दिलीप लांडे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. त्याआधी हे मनसेचे नगरसेवक होते. परंतु मनसेला रामराम करत लांडे यांनी इतर ५ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दिलीप लांडेंना शिवसेनेने विधानसभेची तिकीट दिली. मात्र अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यावेळी दिलीप लांडे यांनी शिंदे गटात जाणं पसंत केले. सध्या ते बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार आहेत.