Join us

भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 8:43 AM

मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या, दाऊदचा हस्तक कुणाला म्हटले? इटालियन सोनिया गांधी मला चालणार नाही हे कोण बोललं असं सांगत शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मुंबई - दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईत शिवसेनेचे २ दसरा मेळावा पार पडले. एका मेळाव्यात एकीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेले ४० आमदार, १२ खासदार उपस्थित होते तर दुसरीकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. गेल्या ५६ वर्षाची दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र यंदा प्रथमच शिवसेनेत उभी फूट पडल्याने २ मेळावे झाले. या मेळाव्यात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंवर नाव घेऊन टीका केली. 

व्यासपीठावर भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी गुलाबराव पाटलांना तुमच्याकडे मोबाईल आहे का? असं विचारलं. तुमच्या पाया पडतो, त्या उद्धव ठाकरेंना फोन करा. २ मिनिटे इथं येऊन बघा, मग खरी शिवसेना कुठली हे तुला कळेल असं म्हणताच सभास्थळी हशा पिकला. यावेळी शहाजी पाटील म्हणाले की,  हे भगवं वादळ उद्धव ठाकरेंनी बघितलं तर महाराष्ट्रात खरी शिवसेना कुठली याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार नाही. व्यासपीठावरील प्रत्येक आमदार, खासदारानं जनतेला भाजपा-शिवसेना युतीचं सरकार बनवू सांगितले. निवडणूक निकालानंतर सगळी बिघडाबिघडी सुरू झाली. तुम्ही आज गद्दारी म्हणताय. २०१९ ला तुम्हाला जनतेने शाबासकी दिली का? देवेंद्र फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसला हे महाराष्ट्र विसरला नाही. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला. मी काँग्रेसमध्ये होतो. नेहमी बाळासाहेब ठाकरेंची सभा ऐकायचो. मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या, दाऊदचा हस्तक कुणाला म्हटले? इटालियन सोनिया गांधी मला चालणार नाही हे कोण बोललं. अडीच वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचे तुकडे तुम्ही केले असा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला. 

त्याचसोबत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेबांचे वारस म्हणून तुमचा आदर आहे. परंतु आमदारांना फरफटत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं. हे पाप तुमचं आहे. हे पाप एकनाथ शिंदेंनी फेडलं. जर आम्ही उचलले पाऊल जनतेला आवडलं नसतं अनेक मेळावे राज्यभरात झाले. लाखोंनी माणसं जमा झाली नसती. तळागाळातून आवाज आला. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा मुख्यमंत्री बनला. शहरात येऊन रिक्षा चालवायचा. त्यांना महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे असं कौतुक आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले.

गुवाहाटीच्या औषधानं बाप-पोरात ताकद आलीअडीच वर्ष मुख्यमंत्री जनतेला सापडला नाही. साडेतेरा कोटी जनता अडचणीत असताना लोकप्रतिनिधींना जनतेपासून तोडण्यात आले. आता ताकद, ऊर्जा शक्ती बाप-पोरात आली. गुवाहाटीच्या डोंगरातून आयुर्वेदिक औषध आणलं ते दिल्याने राज्यभरात फिरू लागलेत. महाराष्ट्रात भडकवणार, पोरं एकमेकांची डोकी फोडणार आणि ही दोघं मातोश्रीत बसून पोहे खाणार असा टोला शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना