मुंबई-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात शिवसेनेच्या वतीने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्या महापालिकेच्या कर्मचारी असल्यानं त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण तो अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून महापालिका आयुक्तांवर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोप आज ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आमदार अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिंदे गटावर खळबळजनक आरोप केले आहेत.
"शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आम्ही उमेदवारी जाहीर केली होती. रमेश लटके हे तळागळातील शिवसैनिक असल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्या महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. पण निवडणुकीसाठी त्यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजीच राजीनामा दिला. पण तो मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे महिन्याभरानंतर त्या विचारपूस करण्यासाठी गेल्या असता राजीनाम्याच्या पत्रात त्रृटी असल्याचं सांगण्यात आलं. पुढे त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी नव्यानं राजीनामा दिला. महापालिकेच्या नियमानुसार राजीनामा देताना १ महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. तशी ती दिली गेली होती. तरीही अद्याप राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारावा यासाठी मी स्वत: महापालिका आयुक्तांना तीन वेळा भेटलो. पण त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही. त्यांच्यावर शिंदे गटाचा दबाव असल्याचं दिसून येत होतं", असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
शिंदे गटाकडून ऋतुजा यांच्यावर दबाव"महापालिकेच्या सेवाशर्थीमध्ये स्पष्ट नमूद आहे की १ महिन्याची नोटीस सर्व्ह केली नाही. तर एका महिन्याचा पगार कोषागारात जमा करावा लागतो. त्या तोही करण्यास तयार आहेत. तसंच ऋतुजा लटके यांच्यावर आजवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. याशिवाय कोणते ड्युज देखील नाहीत. त्यामुळे राजीनामा तात्काळ मंजूर व्हायला हवा होता. खरंतर त्या महापालिकेतील क गटातील कर्मचारी आहेत. मग त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा थेट महापालिका आयुक्तांकडे जाण्याचा विषयच नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा जाणूनबुजून स्विकारायचा नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा लटके जर शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असतील तर लगेच राजीनामा स्विकारला जाईल असा दबाव त्यांच्यावर आणला जात आहे अशा बातम्या आम्ही पाहात आहोत. पण लटके कुटुंबीय निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते ठाकरे गटाकडूनच निवडणूक लढवतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे", असं अनिल परब म्हणाले. महापालिकेविरोधात कोर्टात धाव"अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदावारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेकडून स्विकारण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही आता कोर्टात दाद मागितली आहे. मुंबई हायकोर्टात याबाबतची याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की न्याय मिळेल", असंही अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.