लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे- कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर आज, बुधवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गट समर्थक मोठ्या संख्येने बीकेसी मैदानात उतरणार आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार केलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री या मेळाव्यात नक्की काय बोलणार, नवीन गौप्यस्फोट करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बीकेसी मैदानावरील या मेळाव्याला राज्यभरातून शिंदे गटसमर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज्यभरातील शिंदे समर्थक मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघाले आहेत.
पदभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आपल्यासोबत आलेल्या ५० आमदारांच्या मतदारसंघातील बहुतेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्रांनी केला. शिंदे गट आणि भाजप सरकारला ७ ऑक्टोबरला १०० दिवस पूर्ण होत असल्याने मेळाव्याबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, देशभरातील शिवसेनेच्या १३ प्रदेशप्रमुखांनी शिंदे यांना पूर्वीच पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राज्यासह राज्याबाहेरही पक्षाची मजबूत बांधणी करता यावी, यासाठी आवश्यक असलेल्या विचारांचे खरे सोने लुटण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी खाण्याची खास सोय करण्यात आली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमधून फूड पॅकेट्स ऑर्डर करण्यात आली आहेत. शिंदे गटाकडून प्रशांत कॉर्नरला तब्बल अडीच लाख फूड पॅकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यात कचोरी, गुलाबजाम, खाकरा यांच्यासह अन्य पदार्थही असतील.
बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी व्यवस्था
प्रवेश बंदी मार्ग (दसरा मेळाव्याकरिता लोकांना घेऊन येणारी वाहने वगळून)
- पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सीलिंककडून बीकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने. - संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने. - खेरवाडी शासकीय वसाहत कनाकिया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने. - सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शनवरून बीकेसी परिसर, धारावी, वरळी सीलिंकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून.
पर्यायी मार्ग
पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सीलिंककडून बीकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने फॅमिली कोर्ट जंक्शन येथून यू-टर्न घेऊन, (खेरवाडी वाहतूक. वि. हद्दीत) एमएमआरडीए जंक्शन येथून डावे वळत घेऊन टू जंक्शनवरून कुर्लाकडे तसेच पूर्व द्रूतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.
संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक हॉस्पिटलजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगरमार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरून कुर्लाकडे मार्गस्थ होतील.
खेरवाडी शासकीय वसाहत कनाकिया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथून यू-टर्न घेऊन (खेरवाडी वा. वि. हद्दीत) शासकीय वसाहतमार्गे कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी. वा. वि. हद्दीत) टी जंक्शन पुढे कुर्लाकडे मार्गस्थ होतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"