Maharashtra Political Crisis: “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:50 PM2022-08-25T12:50:15+5:302022-08-25T12:51:18+5:30
Maharashtra Political Crisis: विधिमंडळ परिसरात शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून मातोश्री आणि ठाकरे घराण्याला लक्ष्य करण्यात आले.
Maharashtra Political Crisis: आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सकाळीच कब्जा केला आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात आले. तसेच सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे घराण्यावर निशाणा साधण्यात आला.
सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
आदित्य ठाकरे टार्गेटवर
शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला. "महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला.
दरम्यान, आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर, पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन MLC चे लागते कुशन, खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार, युवराजांची दिशा नेहमीच चुकली, अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून गेल्याचे सांगितले जात आहे.