युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:39 AM2022-08-25T10:39:40+5:302022-08-25T10:42:19+5:30

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते.

eknath shinde group targeted aaditya thackeray protest on the steps of the Vidhan Bhavan | युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

googlenewsNext

मुंबई-

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर आजही सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सकाळीच कब्जा केला आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. लक्षवेधी बाब अशी की शिंदे गटातील आमदारांकडून यावेळी शिवसेनेचे आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 

शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात येत आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे. "महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला आहे. 

शिंदे गटातील आमदारांकडून आज प्रामुख्यानं आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आमदार घोषणाबाजी करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील याठिकाणी पोहोचले आणि विधानभवनात जात असताना त्यांनी आमदारांना शांततेनं आंदोलन करा असा सल्ला दिला. त्यानंतर ते विधानभवनात गेले. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या.

आदित्य ठाकरेंविरोधात कोणत्या घोषणा?

  •  पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर
  • पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन MLC चे लागते कुशन
  • खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार
  • युवराजांची दिशा नेहमीच चुकली

Web Title: eknath shinde group targeted aaditya thackeray protest on the steps of the Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.