मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन; १५० शाखा उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:17 PM2022-10-12T12:17:21+5:302022-10-12T12:25:41+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असून, एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा एक गट असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटानेही मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या आधी शिंदे गट मुंबईत १५० शाखा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या शिंदे गटाने मुंबईत ३० शाखा सुरू केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात १५० शाखा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना भवनसमोरील कोहीनूर इमारतीमध्ये शिंदे गट कार्यालय सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेतील दोन गट आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ही शिंदे गटासाठी लिटमस टेस्ट असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे, तर दुसरीकडे शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आयोगाने दोन्ही गटांना नवे चिन्ह आणि नवी नाव दिली आहेत.
एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघर पोहोचविण्याठी या गटाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.