पालिका निवडणुकीची शिंदे गटाची जोरदार तयारी
By मनोहर कुंभेजकर | Published: September 6, 2022 05:26 PM2022-09-06T17:26:27+5:302022-09-06T17:26:59+5:30
आगामी पालिका निवडणुकीला शिंदे गटदेखील सज्ज असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुंबई-देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर झालेल्या बैठकीत भाजपच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई महानगर पालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी मुंबई भाजपला दिले होते. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी सहा पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेटी देण्याचा आपला सपाटा सुरू ठेवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे सहा वाजे पर्यंत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी दिल्या आणि आगामी पालिका निवडणुकीला शिंदे गट देखील सज्ज असल्याचे संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी चक्क माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व माजी नगरसेवक अमय घोले यांच्या वडाळा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला मध्यरात्री दोन वाजता भेट दिली. आज सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांनी दक्षिण मध्य मुंबईच्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या अशी माहिती शिंदे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आमची शिवसेना-भाजप युतीची सत्ता महापालिकेत येणार असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
अमय घोले आदित्य ठाकरे यांची साथ सोडणार?
माजी मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व माजी आरोग्य समिती अध्यक्ष अमय घोले यांच्या वडाळा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री दोन वाजता भेट दिली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे आता अमय घोले सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.